अर्धवट कामे, बाह्य़वळणांची डोकेदुखी
दर वर्षी पावसाळ्यात शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून या वर्षी मुक्तता मिळणार, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असला तरी वाहतूक कोंडीतून यंदाही सुटका नाही, अशी परिस्थिती आहे. ‘लोकसत्ता’ने या महामार्गावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता, खड्डेमुक्ती काही प्रमाणात शक्य असली तरी अर्धवट कामे व बाह्य़वळणांमुळे वाहतूक कोंडी मात्र कायम राहणार आहे.
पावसाळा आला की, गेली तीन वर्षे चर्चा सुरू होते ती शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची. मुंबईच्या प्रवेशद्वारावरच काही मिनिटांच्या प्रवासासाठी रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण होत असल्याने दोन ते तीन तास रखडपट्टी करावी लागत होती. या महामार्गावरील खड्डय़ांचा प्रश्न नागपूर अधिवेशनातही गाजला होता. त्यानंतर या महामार्गावरील डांबरीकरणाच्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेले काही महिने काम सुरू आहे. हे काम पावसाळय़ापूर्वी संपवून दर वर्षीची समस्या या वर्षी होणार नाही, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. मात्र अर्धवट कामे व दिलेल्या बाह्य़वळणांमुळे वाहतूक कोंडीतून सुटका अशक्य आहे. वाशी टोलनाका, वाशी गाव, तुर्भे उड्डाणपूल, शिरवणे उड्डाणपूल, उरण फाटा उड्डाणपूल तसेच बेलापूर जंक्शन येथील कामांमुळे वाहतूक कोंडी होणार असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी खड्डय़ांमुळे व वाहतूक कोंडीमुळे तीन जणांचा बळी गेला होता.
पाण्याचीही कोंडी
मॅकडोनाल्ड हॉटेल ते कळंबोली सर्कलपर्यंत पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही वाट नियोजित नाही. महामार्गाला जोडून असलेला सेवा रस्ता सिडको मंडळाकडे आणि महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अशा दुहेरी सरकारी हद्दीच्या कात्रीत हे नाले अडकले आहे. खारघर व रोडपाली येथे दोन, कामोठे येथे एक आणि कळंबोली सर्कल येथे एक असे चार भुयारी मार्ग मागील पाच वर्षांपासून पाण्याखाली गेले आहेत. तरीही हा भुयारी मार्ग सामान्यांसाठी खुला होण्यासाठी कागदोपत्री वगळता प्रात्याक्षिकाद्वारे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. कळंबोली बसथांब्यापासून व्यंकट हॉटेलपर्यंत साचणारे पावसाळी पाणी ही मुख्य समस्या आहे. मागील पाच वर्षांपासून चार तास सततचा पाऊस पडल्यावर येथे मोठय़ा प्रमाणात महामार्गावर पाणी साचते. यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे नाल्याचे काम हाती घेतले, मात्र हे काम पावसाळ्यात पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदा कळंबोली ते व्यंकट हॉटेल हे सुद्धा पावसाळी पाणी साचणार हे निश्चित आहे. मुंबईकडे जाणाऱ्या या महामार्गावर रोडपाली उड्डाणपुलाखाली काही प्रमाणात वाहतूक होण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलावर सुरू असणारे काम तसेच खारघर टोलनाका यामुळे ही कोंडी असण्याची शक्यता आहे. तसेच खारघर टोलनाक्यालगत उजव्या बाजूला महामार्ग सखल असल्याने येथेही पावसाळी पाणी साचण्याची लक्षणे वर्तविण्यात येत आहे.
शीव-पनवेल महामार्गावर बांधकाम विभागामार्फत कामे सुरू आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. – सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग
शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कल ते वाशीपर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी काँक्रीटीकरण केले नाही, तिथे डांबरीकरण केले आहे. पावसाळ्यानंतर तेथेही काँक्रीटीकरण करण्यात येईल. रस्त्यावर खड्डे होणार नाहीत याची खात्री आहे. ज्या ठिकाणी बाह्य़वळण देण्यात आले आहे, त्या ठिकाणी कामे सुरू असून ते काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षी वाहतूक कोंडी होणार नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे. – किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
येथे होणार वाहतूक कोंडी
वाशी गाव येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काम अद्याप सुरू आहे. तसेच याच ठिकाणी रस्त्यावरील पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांचे खोदकाम सुरू आहे. वाशी शहरातून उड्डाणपुलाखालून मुंबईच्या दिशेने जाताना बाह्य़वळण दिल्याने आताच वाहतूक कोंडी होत आहे.
तुर्भे उड्डाणपुलावर जाताना डांबरीकरणाचा रस्ता आताच खराब झाला आहे. पुण्याच्या दिशेने खाली जाताना एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण अर्धवट आहे. त्यामुळे येथेही बाह्य़वळण दिल्यामुळे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होत आहे.
शिरवणे उड्डाणपुलावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन मार्गिकांचे काँक्रीटीकरण झाले आहे. एका मार्गिकेचे काम न झाल्यामुळे डांबरीकरण करण्यात आले आहे. मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गावरही काम अंतिम टप्प्यात आहे. येथेही बाह्य़वळणामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
उरण, नेरूळ उड्डाणपुलावरील काम सुरूच करण्यात आले नाही. त्यामुळे या उड्डाणपुलावर दोन्ही दिशांन खड्डे पडून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
बेलापूर खिंडीतून महामार्गावरून बेलापूर जंक्शन येथे उतरल्यावर तेथील सर्कल पालिकेने काढून टाकला आहे; परंतु सर्वच दिशेने एकत्र गाडय़ा येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. येथे सिग्नल लावण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
शीव-पनवेल महामार्गावर बेलपाडा ते कळंबोली सर्कल या दरम्यान पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाणे अजूनही जशीच्या तशी आहेत.
कोपरा गावचा पूल ओलांडल्यावर उजव्या हाताचा रस्त्याचा भाग सखल असल्याने तेथे जमणारे पावसाळी पाणी निघण्यासाठी किंवा हा भाग उंच करावा यासाठी अद्याप प्रयत्न केलेले नाहीत.
कामोठे थांब्यावर कळंबोली येथे पावसाळी पाणी जाण्यासाठी वाटच नसल्याने येथे पाण्यातून प्रवाशांना कसे जावे, असा प्रश्न या वेळी नव्याने उद्भवण्याची चिन्हे आहेत.