Headlines

तुकाराम मुंढेंचा थेट अमेरिकेत बोलबाला! The New York Times फ्रंट पेजवर झळकले; ‘रॉकस्टार’ उल्लेख करत मुंढेंबद्दल लिहिलंय तरी काय?

महाराष्ट्राचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांचा डंका आता जगभरात वाजतोय. अन्न व औषध प्रशानाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तुकाराम मुंढे हे चर्चेत आले आहे. महाराष्ट्रातील अन्नभेसळीविरोधात त्यांनी मोठी मोहिम उघडली आहे. त्यांनी अनेक मोठ्या रेस्तराँ आणि हॉटेलवर धाड टाकत मोठी कारवाई केली. त्यांच्या या कारवाईची दखल व कामाचे कौतुक देशभरातील अनेक मान्यवरांनी घेतली. मात्र तुकाराम मुंढे यांचे काम आता सातासमुद्रापार पोहोचले आहे. अमेरिकेतील आघाडीचे वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सने तुकाराम मुंढे यांची दखल घेतली आहे. वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर त्यांना स्थान देत रॉकस्टार असा उल्लेख करण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर खाद्यपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छ रेस्तराँ, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनांविरोधात मोठी मोहिम उघडली होती. मुंबईसह विविध शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अचानक तपासणी करण्यात आली. तेव्हा भेसळ व अस्वच्छता आढळताच तात्काळ परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या याच कामाची दखल न्यूयॉर्क टाइम्सने घेतली आहे.

न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेबद्दल नमूद करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमुळं मुंबईत रेस्टॉरंट क्षेत्रात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

रॉकस्टार असा उल्लेख करत कौतुक

द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे की, भारतातील एका अन्नसुरक्षा अधिकाऱ्याने आपल्या कारवाईमुळं रॉकस्टारची लोकप्रियता मिळवली आहे. मुंबईतील विविध रेस्तराँवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमुळं ते अनपेक्षितपणे सेलिब्रिटी ठरले असून या कारवाईंमुळं भारतातील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत मोठी चर्चा सुरू झाल्याचे वृत्तात म्हटलं आहे.

हायप्रोफाइल कारवाईचा उल्लेख

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी ऑलिम्पिया कॉफी हाऊसवरील कारवाईचाही न्यूयॉर्क टाइम्सने विशेष उल्लेख केला आहे. जवळपास शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या अस्थापनाला बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तुकाराम मुंढे यांच्या करिअरमधील ही हाय प्रोफाइल कारवाई असल्याचेही वृत्तात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *