खेल
जेव्हा विराट कोहली ‘द ग्रेट खली’ला भेटतो…
- 133 Views
- August 07, 2017
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
एरवी सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी रात्री WWE स्टार ‘द ग्रेट खली’सोबतचा फोटो शेअर केला. खलीला भेटणे हा माझ्यासाठी खास अनुभव होता. तो एक चांगला खेळाडू आहे, असा संदेशही कोहलीने ट्विटमध्ये लिहला आहे.
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल कोलंबो कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी खलीही आला होता. त्यावेळी विराटला खलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कोहलीने खलीसोबत दोन फोटो काढले आहेत. यापैकी उभे राहून काढलेल्या फोटोत खलीचा ‘विराट’ देह पाहून कोहलीच्या चेहऱ्यावर उमटलेल्या विस्मयचकित झाल्याच्या भावना स्पष्टपणे दिसत आहेत.
It was Great to meet The Great Khali, what a guy!
कोलंबो कसोटी चौथ्या दिवशी श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने, श्रीलंकेविरुद्धची मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने ५ बळी घेत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. त्याला हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विनने २ आणि उमेश यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली. कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं. तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात शतकवीर कुशल मेंडीसला माघारी धाडण्यात अखेर भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले होते. त्यानंतर आजच्या दिवशी सकाळच्या सत्रात दिमुथ करुणरत्ने आणि नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. यादरम्यान करुणरत्नेने आपलं शतकही साजरं केलं. त्याला दुसऱ्या बाजूने पुष्पकुमाराने चांगली साथ दिली, मात्र मात्र रविचंद्नन अश्विनला रिव्हर्स स्विप फटका खेळण्याच्या नादात तो माघारी परतला. पाठोपाठ रविंद्र जाडेजाने कर्णधार दिनेश चंडीमलला स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेला झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला चौथा धक्का दिला.
मात्र यानंतरही दिमुथ करुणरत्ने एका बाजूने संघाचा किल्ला लढवत होता. अखेर जडेजाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने झेल टिपत करुणरत्नेला माघारी धाडलं. तब्बल ३०७ चेंडुंचा सामना करत त्याने १४१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकारांचा समावेश होता. करुणरत्नेले अँजलो मॅथ्यूजसोबत पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज लंकेची नौका पार करुन देणार असं वाटत असतानाच रविंद्र जाडेजाने करुणरत्नेला माघारी पाठवलं. पाठोपाठ जाडेजाच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज यष्टीरक्षक साहाकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर अवघ्या काही मिनीटात दिलरुवान पेरेरा जाडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना यष्टीचित झाला. यानंतर निरोशन डिकवेला आणि धनंजय डिसिल्वा यांनी काही प्रमाणात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण जाडेजाने डिसिल्वाला माघारी धाडत लंकेला बॅकफटूवर नेलं. यावेळी श्रीलंकेचे ८ गडी माघारी परतले होते. यानंतर तळातल्या फलंदाजांनी भारतील गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला नाही. ठराविक अंतराने धनंजय डिसिल्वा आणि नुवान प्रदीप हे माघारी परतले आणि भारताने कोलंबो कसोटीत आपला विजय निश्चित केला.