परप्रांतीय उमेदवारावरुन भाष्य करणाऱ्या संजय राऊतांना नाना पटोलेंचं प्रत्युत्तर?; म्हणाले “काँग्रेसची चूक दाखवण्याची परंपरा…”
राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं असून स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती असं स्पष्ट मत मांडलं आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे अशा शब्दांत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
इम्रान प्रतापगढी यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून यावेळी नाना पटोले तसंच इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं
“काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे. केंद्रातील कमकुवत सरकारने आठ वर्षात देशाची वाट लावली असून त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे त्यातील ही एक मानसिकता आहे. आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिला”, असं सांगत नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे आभार मानले.
